व्यथा भुताची

16
1009

मी व्यथित आहे, कारण मी एक भूत आहे . म्हणजे; माझं आडनाव भूत आहे. बालपणी आम्ही दोघी बहिणी एकाच शाळेत असताना शिक्षक आमचा उल्लेख असा करायचे,”दोघी भूतं नाचात आहेत ना ?भाषणात लहान भुताला घ्या. मोठं भूत फारच अशक्त आहे . तिच्या अमावस्या पौर्णिमेच्या सुट्ट्या ठरलेल्याच असतात पण तब्येतीच्या बरं का?” पाचवीत नव्या शाळेत गेल्यावर हजेरी घेताना ‘भूत ‘ म्हणून ओळख झाली की वर्गात हसा पिके . प्रत्येक शिक्षक आणि विद्यार्थी या भुताला बघून जणु काही एलियन बघितल्याचा आनंद घेई. आमची शाळा जुनी असल्याने आमचे वाडवडिलही तिथेच शिकले. तेव्हा जुने शिक्षक हमखास विचारायचे काय गं तुम्ही मोठ्या भुताच्या की  लहान भुताच्या मुली ? मग मी एका दमात आमचा सर्व इतिहास सांगायची. “सर मी लहान भूत ,मोठी भुतं आताही किल्ल्यातच राहतात. आम्ही महालात राहतो. सर्व मोठ्या भुतांची लग्न झालीत, आम्ही लहान पंचमहाभुतांपैकी चारच भुतं उरलो आहोत. आम्ही महालात देवांच्या घरात राहतो.”सर-“बेटा ,महालात भुताचे देऊळ आहे ते तुमच्या नात्यात आहे का ?” “हो सर ,ते भुताचे नाही गणपतीचे देऊळ आहे . ” याच वर्गात समदुःखी असणाऱ्या दोन मैत्रिणी मला भेटल्या मी खुश झाले. भूत-भुते-भुताड. सर्व शिक्षक आम्हा भूत परिवारावरच  प्रश्नांची सरबत्ती सोडायचे.

आठवीत पुन्हा नवीन मुलं आणि नवीन शिक्षक.  मराठीच्या दामले सरांनी ‘ लोकभ्रम ‘ पाठाची प्रस्तावना सुरु केली.  “लोक म्हणतात की भूत असतात . ” “मुलं – हो हो सर भुतं आहेत. ” “भूत रात्री १२ नंतर पांढऱ्या वेशात केस मोकळे सोडून फिरतात.” “नाही सर, काही भुतं दिवसाही दिसतात. दोन वेण्या व गणवेशातसुद्धा येतात.” वर्गातला गोंधळ वाढतच होता. शेवटी मी सरांना सांगितले,”मी भूत आहे.” हे ऐकताच सिरांचा लोकभ्रम मिटला.

वडील गेल्यानंतर घराची पूर्ण जबाबदारी बारा वर्षांच्या माझ्या मोठ्या बहिणीवर आली. कंट्रोलचे  कार्ड कसे काढावे हे विचारण्यासाठी ती सकाळची शाळा सुटल्यावर बारा वाजता दुकानात गेली.  दुकानदाराला ‘भूत ‘ आडनाव माहीतच नव्हतं. भूत आडनाव सांगण्याची आणि बाराचा ठोका होण्याची एकच गाठ पडली. ताईचे पाऊल उलटे नाही ना हे पडताळून उद्या ये असे सांगूनत्याने तिला  हाकलून लावले. पुन्हा बारा वाजता गेल्यावर त्याने तिला विचारले ,”काय गं तुला दुसऱ्या वेळेला येणं  जमत नाही का?” ती म्हणाली ,”ठीक आहे मी चार तारखेला येते सर्वपितृ अमावास्येची सुटी आहे मला ” हे ऐकून त्याची बोबडीच वळली

एकदा मध्यरात्री दोनच्या सुमारास आमच्या दारावरची कडी कुणीतरी ठोठावली.  आम्ही झोपेतून जागे झालो.  आम्ही चारही बहिणी आईला बिलगलो. आईने आपल्या पिलांची व्याकुळता पहिली. तिने आम्हा सर्वाना बाजूला सारलं आणि एक मोठी काडी घेऊन ती दाराजवळ खंबीरपणे उभी राहिली. बाहेरून कुण्या दोन आडदांड माणसांचा आवाज आला. ” यहा पे कौन राहता है?” आई मोठयानेच बोलली ‘भूत” ही दोन अक्षरे ऐकून बाहेरची मंडळी पार विरघळून गेली. कारणही तसेच होते. महालातील घरे गल्लीबोलीतील, त्यातही आमची बोळ बरीच लांब होती. शेवटपर्यंत एकही घर नव्हते. पायवाटेवर वरच्या औदुंबराच्या झाडाची पडलेली पाने पावलाखाली  करकर वाजायची. झाडावरील पिकलेली उंबरे टपटप पडायची ,पिचपिच फुटायची.  अंधार म्हणतो मी. येणारी माणसं  तिथे पहिल्यांदाच आलेली. आमच्या घराच्या शेवटून एक बोळ होती. तिथून जोशींच्या घरी जायचा रास्ता होता. ते स्वतः कोर्टात काम करायचे. त्यांच्याकडे रात्रीबेरात्री महत्वाच्या कामासाठी बरीच मंडळी येत आणि त्या सर्वाना आमच्या भूत दरवाजाचा सामना करावा लागे . आईला   बाहेरच्या लोकांचा अंदाज आला. तिने प्रतिप्रश्न केला.” आपको  कौन चाहिये ?” यमसदनी आलेली ती मंडळी रडवेली होऊन आम्हा भूतांची याचना करू लागली.  “हमे  कुछ नही चाहिये , हमे  सिर्फ जोशी के यहा जाना  था।” आईने त्यांना आपल्या आडनावाचा थोडक्यात परिचय सांगितला आणि जोशींकडे त्यांना सुपूर्द केले. आपल्या आडनावात किती सामर्थ्य आहे याची कल्पना मला त्या बालवयात  आल्यावाचून राहिली नाही.

माझं लग्न जमलं त्यावेळीही सासरच्या मंडळींनाही या भूत आडनावाची झळ पोहचल्याशिवाय राहिली नाही. कुणीही त्यांना एक साधा प्रश्न विचारात “कुणाची मुलगी पसंत केली?” त्यावर ‘भुताची ‘ हे उत्तर त्यांना मिळे. त्यावर त्यांचा अद्भुत प्रश्न असे ” का बुवा माणसांची मुलगी नाही का हो  मिळाली?” माझ्या यजमानांनाही त्यांचे मित्र चिडवत ” काय हो डोळस तुम्हाला भूत कसे दिसले ?” ” डोळसांनाच  भूत दिसेल ना?” ते म्हणत. एका शाळेत शिक्षिका म्हणून निवड झाली. पण तिथल्या मुद्याध्यापीका म्हणाल्या “मॅडम, तुमचे भूत आडनाव ऐकले तर मुले हंगामा करतील. ” तेव्हा डोळस या आडनावाची ढाल माझ्याजवळ असल्याने मी वाचली. माझ्या चुलतभावाला दुसरी मुलगी झाली तेव्हा मी खूप खूष झाली. कारण या ‘भूत ‘आडनावाची  जीवघेणी परंपरा आता बंद झाली होती. पण हा माझा गैरसमज  होता. माझे जेव्हा सीझर करायची वेळ आली तेव्हा डॉक्टर म्हणाले ” सीझर आजच करावे लागेल. पण दिवस वगैरे आजचा चालेल का ? आज सर्वपितृ अमावस्या आहे. ” मला पुन्हा एकदा आपल्या भूत आडनावाची प्रचिती आली. हे  चिकटलेलं भूत काही मानगुटीवरून निघत नव्हते. अखेर  परमेश्वराला  या भूताने हात जोडले. अमावास्येच्या  या नवीन मूल भूताचा स्वीकार आनंदाने केलाआणि भुताची व्यथा गोड कथा झाली.

Teacher by profession; Reader,writer & moral supporter by choice..

16 COMMENTS

  1. गीतु
    छान मला पन मुम्बईला असतानाअशेच आणि छान अनुभव आले
    आता आठवले की हसयला येत।

  2. क्या बात है अप्रतिम….. सुरेख….. खूप छान…. 😊👍🙏👋👋👏😊

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here